देशभरात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून आता एक संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. आईच्या प्रियकराने सात वर्षांच्या मुलाच्या डोक्यावर वरवंट्याने मारा करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.अंबरनाथमधील धक्कादायक घटना समोर आली आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका परिसरात राहणारी सकीना कुरेशी आपल्या सात वर्षांचा मुलगा हुसनैन कुरेशी सह राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, तिचे विकास सिंग याच्यासोबत प्रेम संबंध होते. पोलीस तपासानुसार, मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने विकास सिंग याने हुसनैनला मारण्याचा प्लॅन केला.
विकास सिंग याने प्लॅननुसार मुलाच्या डोक्याचा घाव करून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या हुसनैनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी विकास सिंगला अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, घटनेमागील आणखी कारण आणि इतर पैलूंचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना का देण्यात आली नाही आणि मुलाची आई सकीना कुरेशी हिने घटनाक्रम लपवण्याचा प्रयत्न केला का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या अमानुष घटनेने अंबरनाथ मध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत.