भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत त्याला तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या वारंवारच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत हा निर्णय देण्यात आल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या अचानक आलेल्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने आयपीएलमधील दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटपटू अभिषेक पोरेलचे नाव एका बलात्कार प्रकरणात समोर आल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी पोलिसांना क्रिकेटपटूची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे निर्देशही दिले.
आयपीएल क्रिकेटपटूविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या पीडितेच्या डिव्हाइसमध्ये काही छायाचित्रे असण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या पोरेलविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला. पीडितेने तक्रारीत म्हटले की, पोरेलने २३ जून २०२६ रोजी तिच्यावर हल्ला केला. त्याशिवाय धमकीही दिली.
न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी पोलिसांना तपासात अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही दिले. पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. जूनमध्ये एका विद्यार्थिनीने हुगळीतील मोगरा पोलीस ठाण्यात क्रिकेटपटू अभिषेक पोरेलविरोधात गंभीर तक्रार दाखल केली होती. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे आणि आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देणे, यासह अनेक गंभीर आरोप तिने केले आहेत. या प्रकरणी आता कोर्टाने अभिषेक पोरेल याला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.