धक्कादायक ! अंगणवाडीच्या पोषण आहारात बंद पॅकेटमध्ये आढळला मृत पक्षी: नाशिकमधील घटना
धक्कादायक ! अंगणवाडीच्या पोषण आहारात बंद पॅकेटमध्ये आढळला मृत पक्षी: नाशिकमधील घटना
img
Nandini khandare More

 अंगणवाडीत लहान मुलांना पोषण आहार दिला जातो. या आहाराच्या माध्यमातूम मुलांचे व्हंगले पोषण व्हावे त्यांना चांगला पौष्टिक आहार मिळावा हा मुख्य उद्देश असतो.  परंतु एका अंगणवाडीत आता याच पोषण आहारातून लहान मुलांचे जीवाला धोका निर्माण होईल अशी घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंगणवाडीतील मुलांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळला आणि एकच खळबळ उडाली.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथे अंगणवाडीतील पोषण आहाराबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील देवगाव बिट क्रमांक दोनमधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून नियमितप्रमाणे लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. संबंधित कुटुंबाने हे पाकीट घरी नेल्यानंतर ते उघडताना त्यामध्ये मृत पक्षी असल्याचे निदर्शनास आले. पक्षी कुजलेल्या अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला असून, हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. 

 या घटनेमुळे अंगणवाडीतून वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या योजनेत अशा प्रकारची निष्काळजीपणा आढळणे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच पोषण आहाराच्या उत्पादन, पॅकिंग आणि वितरण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. 

 दरम्यान, संबंधित प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. तपासानंतर नेमके तथ्य समोर येणार असले तरी या घटनेमुळे अंगणवाडी लाभार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांकडून करण्यात येत आहे.
इतर बातम्या
उद्या

Join Whatsapp Group