राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. अर्ध्या तिकिटाच्या नियमांत आता MSRTC ने एक बदल केला आहे.
या बदलानुसार ,आता एसटीने प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आज म्हणजेच १ सप्टेंबर पासून हा नवा नियम लागू करण्यात आला असून जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला अर्ध तिकीट मिळणार नाही. त्यामुळे सवलतीच्या दरात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपले NCMC कार्ड आपल्या जवळ ठेवणे गरजेचे आहे.
१.११ कोटी प्रवाशांची NCMC कार्डसाठी नोंदणी MSRTC कडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्डसाठी आतापर्यंत सुमारे १.११ कोटी प्रवाशांची NCMC कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे. कार्डची नोंदणी आणि वितरणाची जबाबदारी महामंडळाने E-Bix Technologies Ltd या कंपनीकडे सोपवली आहे. सध्या या प्रक्रियेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून, सरकारी सवलतीसाठी पात्र असलेल्या इतर प्रवर्गांचाही पुढील टप्प्यात NCMC प्रणालीमध्ये समावेश केला जाणार आहे.
नव्या नियमानुसार, महिला प्रवाशांसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून प्रवास करताना अर्ध तिकीट भरण्यासाठी NCMC कार्डचा वापर करावा लागणार आहे. जर हे कार्ड प्रवाशांकडे नसल्यास तिकीटाची संपूर्ण रक्कम आकारली जाऊ शकते. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी कार्डमध्ये आवश्यक रक्कम उपलब्ध किंवा कार्ड टॉप-अप केलेले आहे, याची खात्री करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी सर्व एसटी आगारांना Standard Operating Procedure (SOP) देखील पाठवण्यात आली आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दरम्यान, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तूर्तास दिलासा देण्यात आला आहे. या प्रवर्गासाठी NCMC कार्डची सक्तीची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः बायोमेट्रिकच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा बोटांचे ठसे व्यवस्थित नोंदवले जात नसल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी महामंडळाकडून सवलतीच्या तिकीट व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि पात्र प्रवाशांची पडताळणी अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रवाशांनी अद्याप NCMC कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या एसटी आगाराशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.