देशात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या विविध घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान आता अशाच एक भीषण घटनेची माहिती सामोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , उत्तर प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामध्ये ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना प्रयागराज- कौशांबी सीमेवरील मोहम्मदपूर गावात घडली. हे ठिकाणी मनौरी हवाई दल तळापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. या स्फोटामुळे आसपासची गावं हादरली. ही स्फोटाची घटना घडली तेव्हा कारखान्यात कामगार काम करत होते. या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौशांबी जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात दुपारी साडेबारा वाजता ही स्फोटाची घटना घडली. हे गाव प्रयागराजच्या सीमेवर वसलेले आहे. स्फोट झाला तेव्हा फटाक्याच्या कारखान्यात अनेक कामगार काम करत होते. स्फोटामुळे संपूर्ण कारखाना जमीदोस्त झाला. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अकडले आहेत. भीषण स्फोटात ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. कारखान्याच्या १०० मीटर परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या. तीन घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
या स्फोटानंतर पोलिस, हवाई दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे २०० जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्तळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. १० बुलडोझरच्या सहाय्याने ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली काही जण गाडले गेल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हा स्फोट झाला तेव्हा कारखान्यामध्ये २० कामगार काम करत होते. स्फोटानंतर कारखान्याच्या जवळ असलेल्या घरांची पडझड झाली यामध्ये अनेक जण जखमी झाले. स्फोटाचा आवज दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. कारखान्यात स्फोट होऊन भीषण आग लागली. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या स्फोटानंतर कारखान्यात फटाक्यांचे सतत स्फोट होत आहेत. ज्या कारख्यान्यात हा स्फोट झाला त्या कारखान्याचा मालक आदिल असल्याचे सांगितले जात आहे.