पेठ तालुक्यातील हरणगाव येथिल शेतकरी सुभाष रघुनाथ भरसट यांच्या गट क्रमांक १५६ बामुड्यांचा माळ शिवारा मधिल शेतातील घरात मंगळवारी (दि. १) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याने कुटुंबाची घबराट उडाली.
प्रसंगावधान राखत त्यांनी घराचे दरवाजे सुरक्षितरीत्या बंद करून कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी ठेवत तात्काळ वनविभागाला कळविले.
घटनेची माहिती मिळताच ननाशी (प्रा.) वनपरिक्षेत्रातील महाजे राऊंडचे वनकर्मचारी व नाशिक येथील रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखलझाले.
मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास घरात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनात वनपरिमंडळ अधिकारी महाजे बी डी. सूर्यवंशी, वनरक्षक श्रीमती डी. के. पठाण, कृष्णा गांगुर्डे, किरण दळवी रेस्क्यू टीमचे अभिजित महाले, डॉ. हेमराज व त्यांच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न केले.
रेस्क्यू कारवाईदरम्यान हरणगावचे पोलीस पाटील निवृत्ती पवार, संजय भरसट, शिवाजी जाधव, . ओमकार पवार, किरण जाधव, भास्कर जाधव, जयप्रकाश वाघ, प्रकाश राऊत आदीसह ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाला सहकार्य केले.