मोठी बातमी ! दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे;मुंबई हायकोर्टाचा मोठा आदेश
मोठी बातमी ! दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे;मुंबई हायकोर्टाचा मोठा आदेश
img
Nandini khandare More

दिशा  सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टात या प्रकरणी आज सुनावणी झाली असून कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला. हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच तपास केली असल्याची माहिती समोर आली आहे. आता हायकोर्टाने या प्रकरणात बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. .

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर दिशाच्या वडिलांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. “कोणालाही आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, फक्त जबाब नोंदवा. तपास करून योग्य तो निष्कर्ष काढा, मग आरोपपत्र दाखल करा,” असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?
दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. तिच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही घटनांबाबत त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि विविध दावे करण्यात आले. मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणी एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) नोंदवून तपास केला होता. पोलिसांच्या तपासानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र सतीश सालियन यांनी या निष्कर्षावर प्रश्न उपस्थित करत मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला आणि नव्याने तपास करण्याची मागणी केली.


या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तपासाच्या पद्धतीवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. विशेषतः, कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करून गुन्ह्याची तक्रार केली असताना एफआयआर का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला होता. न्यायालयाने ADR आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रत कुटुंबीयांना इतक्या वर्षांनंतरही का देण्यात आली नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. याशिवाय, चौदाव्या मजल्यावरून पडल्याच्या पोलिसांच्या दाव्याशी पोस्टमॉर्टममधील जखमांबाबतची माहिती कशी जुळते, यावरही न्यायालयाने स्पष्टीकरण मागितलं होतं.

दरम्यान दिशाच्या मृत्यूप्रकरणी आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसतानाही निव्वळ राजकीय हेतूने आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे, असा युक्तिवाद शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता. याप्रकरणी सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दिशाच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता.


इतर बातम्या
Join Whatsapp Group