नाशिकमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून काल पासून धो धो बरसणाऱ्या पावसाने आता कहरच केला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. ऐतिहासिक रामकुंड परिसर आणि आसपासची लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा वेढा इतका वाढला आहे की प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे.
गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढवला जात आहे. सध्या धरणातून 12600 ते 13000 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून दुपारी रामकुंड परिसरातील होळकर पुलाखाली पाण्याचा प्रवाह 17390 क्युसेकवर पोहोचला होता. या ठिकाणी इशारा पातळी 13000 क्युसेक तर धोका पातळी 19000 क्युसेक इतकी आहे.
गुरुवारी संध्याकाळी पाण्याचा विसर्ग वाढून तो 19000 क्युसेक पार करताच शहरातील सराफ बाजार आणि सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची थेट शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाच्या अखंड धारेमुळे शहरातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. रामकुंड परिसरातील रामसेतू पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, तर गाडगे महाराज पुलाला पुराचे पाणी टेकले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आणि महापालिकेने गोदाघाट परिसरातील सर्व दुकाने, टपऱ्या आणि स्टॉल्स तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. नदीकाठच्या 3 ते 4 फुटांपर्यंतच्या इमारती आणि घरांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.