नाशिक शहरातील नामवंत आर्किटेक्ट बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब लक्ष्मणराव मगर यांचे आज मुंबई येथील एका इस्पितळात अल्पशा आजाराने निधन झाले.
बाळासाहेब मगर हे राजलक्ष्मी अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक होते. तसेच ते नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे स्थापनेपासून संचालक होते.
आर्किटेक्ट म्हणून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी नाशिक शहरातील हजारो गृहनिर्माण संस्था तसेच विविध वाणिज्य संकुलांच्या इमारत बांधकामांचे नकाशे तयार करून त्यांना मंजुरी मिळवून दिली. बांधकामाच्या दर्जाबाबत ते अत्यंत दक्ष आणि काटेकोर होते. बांधकामाचा दर्जा उत्तम राहावा, यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई या राज्यस्तरीय वित्तीय संस्थेशी ते सुमारे ४० वर्षे गव्हर्नमेंट व्हॅल्यूअर म्हणून कार्यरत होते. या संस्थेच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
बाळासाहेब मगर हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाढीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
ते एक अत्यंत कर्तृत्ववान आणि यशस्वी व्यावसायिक होते. आपल्या व्यवसायात त्यांनी उत्तुंग यश संपादन केले आणि अनेकांना व्यवसाय क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा दिली. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला ते नेहमीच सहकार्य व प्रोत्साहन देत असत. इतरांनी आपली स्वप्ने साकार करावीत आणि जीवनात यशाची उंची गाठावी, यासाठी ते सदैव प्रेरणादायी ठरले.
त्यांच्या निधनाने नाशिकच्या आर्किटेक्चर, सहकार, सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.