राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता सध्या राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठीच्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरू होती. आता हाच तिढा सुटला असल्याची माहिती आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडला असून, खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, हा मतदारसंघ सोडण्याच्या बदल्यात शिवसेनेने राष्ट्रवादीकडून रायगडचे पालकमंत्रिपद पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून रिक्त असलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या खुर्चीवर आता शिवसेनेचे भरत गोगावले विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.