ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर लिंबाचे झाड कोसळले; 31 विद्यार्थ्यांसह शिक्षक सुरक्षित
ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर लिंबाचे झाड कोसळले; 31 विद्यार्थ्यांसह शिक्षक सुरक्षित
img
दैनिक भ्रमर
लासलगाव (वार्ताहर) :- निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील ब्राह्मणगाव (विंचूर) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेव शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे मोठे झाड दोन भागांत तुटून त्यातील एक भाग थेट शाळेच्या इमारतीवर कोसळला. या घटनेत शाळेच्या छतावरील पत्र्यांचे नुकसान झाले. यात सुदैवाने शाळेतील 31 विद्यार्थी तसेच शिक्षक सुखरूप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली.

दुपारच्या सुमारास पावसाची संततधार सुरू असताना अचानक वादळी वारे सुरू झाले. यावेळी शाळेच्या मागील बाजूचे जुने लिंबाचे झाड जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने दोन भागांत तुटले. त्यातील एक मोठा भाग थेट शाळेच्या इमारतीवर कोसळल्याने मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच वर्गात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच महिला व पुरुष शिक्षक घाबरून तातडीने वर्गाबाहेर धावत आले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, झाड कोसळल्याने शाळेच्या छतावरील पत्रे व काही भागील बांधकामाचे नुकसान झाले आहे.

झाडाचा उर्वरित अर्धा भाग अद्याप धोकादायक स्थितीत उभा असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसतील घरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने तातडीने झाड हटवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group