नाशकात जुन्या वादातून दोन कुटुंबांत रक्तरंजित संघर्ष ; चाकू, रॉड, अन काठ्या...
नाशकात जुन्या वादातून दोन कुटुंबांत रक्तरंजित संघर्ष ; चाकू, रॉड, अन काठ्या...
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक रोड येथील आगर टाकळी परिसरातील राजवाडा भागात जुन्या वादातून दोन शेजारी कुटुंबांमध्ये रविवारी सायंकाळी झालेला वाद चांगलाच चिघळला. या हाणामारीत चाकू, लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि फरशीच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला. दोन्ही गटांतील अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिक उपनगर  पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगर टाकळी येथील रहिवासी व इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय करणारे कुमार शिवम जितेंद्र पगारे (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरासमोरील अनुश्री इंटरप्राइजेस या किराणा दुकानासमोर काही जण आरडाओरडा व शिवीगाळ करत होते. याबाबत त्यांनी शेजारी प्रशांत लोखंडे यांना जाब विचारला. याचा राग आल्याने प्रशांत लोखंडे, त्याचे वडील चंदर लोखंडे आणि भाऊ सनी लोखंडे यांनी शिवमला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाण सोडवण्यासाठी शिवमची आई मनीषा पगारे आणि मावसभाऊ अभिषेक घोडेराव मध्ये पडले असता, प्रशांत लोखंडे याने चाकूने शिवमच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शिवमने वार चुकवल्याने चाकू त्याच्या हाताला लागला, तर अभिषेक घोडेराव यांच्या मनगटालाही दुखापत झाली. त्यानंतर चंदर लोखंडे यांनी लाकडी काठीने, तर सनी लोखंडे यांनी फरशीचा तुकडा डोक्यात मारल्याने शिवम गंभीर जखमी झाला. जखमींना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, दुसऱ्या गटातील चंदर बाबुराव लोखंडे (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीत वेगळाच घटनाक्रम नमूद केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते मुलगा प्रशांतला दुकानावर सोडण्यासाठी गेले असता समोर राहणारा सत्यम बाळू उर्फ जितेंद्र पगारे हा मद्यधुंद अवस्थेत आला आणि किरकोळ कारणावरून वाद घालत प्रशांतला मारहाण केली. त्यानंतर सत्यमने घरातून लोखंडी रॉड आणून चंदर लोखंडे यांच्या डोक्यावर प्रहार केला. शिवम पगारे याने लाकडी दांडक्याने, तर अन्य एका नातेवाईकाने दगडाने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याच गोंधळात सनी लोखंडे यांच्या मालकीची ॲक्टिव्हा दुचाकीची तोडफोड करून ती नाल्यात ढकलण्यात आल्याचा तसेच चंदर लोखंडे यांच्या गळ्यातील सुमारे ३ तोळ्यांची सोन्याची चैन आणि विवो कंपनीचा मोबाईल गहाळ झाल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच उपनगर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक पावरा व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बिटको रुग्णालयात जाऊन दोन्ही गटातील जखमींचे जबाब नोंदवले.दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून  नाशिक उपनगर  पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे व पवार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group