गेल्या आठ्वड्यापासून पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाने राज्यात अनेक जिल्यात पुरस्तिती निर्माण झाली आहे.याचदरम्यान आता एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (IMD) विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जनतेला खराब हवामानात विशेष खबरदारी घेण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्यानुसार, मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आज पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, नाशिक घाट परिसर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२ ऑगस्ट रोजी रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट लागूराहील. ४ ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ५ ऑगस्ट रोजी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी वादळी पाऊस आणि मुसळधार पावसादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळ्या जागांवर अनावश्यकपणे जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
हवामानाची परिस्थिती लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. सखल भागांतील पुराचा सामना करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात आहे. प्रशासनाने पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना नद्या, धबधबे आणि घाट परिसरांना भेट देणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.