नाशिक :- नवीन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जापोटी गहाण ठेवलेले तब्बल १४१.५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मुद्दल रक्कम परत करूनही न देता त्यांची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित सराफ योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिंडोरी रोडवरील नायगरा सोसायटी, लोकसहकार नगर येथील रहिवासी व्यावसायिक भोलाचंद मेवालाल गुप्ता (वय ४३) यांना नवीन व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यांनी २२ फेब्रुवारी २०२६ पासून आजपर्यंत कालावधीत ओळखीचे सराफ योगेश दाभाडे यांच्याकडे स्वतःचे, पत्नीचे व मुलांचे मिळून १४१.५५ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवले. दाभाडे याने कोणताही सावकारी परवाना नसताना ४ टक्के दरमहा व्याजदराने गुप्ता यांना १३ लाख रुपये दिले होते.
फिर्यादी गुप्ता यांनी मित्र अजय जितेंद्र गुजराथी यांच्यासमक्ष १३ लाख रुपयांची मुद्दल रक्कम वेळोवेळी दाभाडे यास परत केली. तरीही संशयिताने दागिने परत न करता त्यांची परस्पर विल्हेवाट लावत विश्वासघात व फसवणूक केली. याप्रकरणी गुप्ता यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे करत आहेत.