आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून त्याहूनही भयंकर म्हणजे रचले जाणारे हत्येचे कट. जे कुठल्या सिनेमाच्या कहाणीपेक्षा कमी नसतात. दरम्यान अशाच एका थरारक हत्येचा उलगडा झाला आहे.
हैदराबादमधील नलगोंडा जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणाने तेलंगणात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच शाळेतील इयत्ता दहावीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. चोरी करताना पकडले जाण्याच्या भीतीने या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिकेची तिच्याच १० वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी पैशांसाठी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर हा केवळ दरोड्याचा प्रकार वाटत होता; पण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर धक्कादायक सत्य उघड झाली. मृत्यूपूर्वी फोनवर बोलल्या गेलेल्या 'बेबी' या एका शब्दाने आणि महागड्या आयफोनने या अल्पवयीन मारेकऱ्यांचा संपूर्ण गेम उलटा केला आणि पोलिसांना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवले.
११ ऑगस्ट रोजी रूपा रेड्डी आपल्या घरी एकट्या असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर तब्बल २७ वेळा चाकूने वार करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डवरून एक महत्त्वाचा सुगावा मिळाला. हत्येपूर्वी त्या आपल्या मावशीशी फोनवर बोलत होत्या. फोन बंद होण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी त्यांनी 'बाबू' हा शब्द उच्चारला होता. स्थानिक भाषेत विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना प्रेमाने 'बाबू' म्हटले जात असल्याने, पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून चौकशी सुरू केली.
हत्येनंतर काही दिवसांतच दहावीत शिकणारे दोन विद्यार्थी अचानक मित्रांना महागड्या पार्ट्या देऊ लागले आणि भरमसाट पैसे उधळू लागले. यावरून संशय बळावल्याने पोलिसांनी बुधवारी सकाळी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले, अशी माहिती नलगोंडाचे पोलीस अधीक्षक (SP) शरतचंद्र पवार यांनी दिली. पोलिसांनी एका आरोपीकडून १.५१ लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक महागडा आयफोन जप्त केला. सुरुवातीला त्याने हे पैसे पालकांनी दिल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा बनाव उघडा पाडला अन् त्या मुलांचे बिंग फुटले.
शाळेतील कारवाईचा राग अन् चोरीचा प्लॅन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोन्ही मुलांना दारूचे व्यसन होते. त्यापैकी एकाला बाईक-कार चालवण्याची आवड होती आणि त्याला एका रात्रीत श्रीमंत व्हायचे होते. हत्येच्या १५ दिवसांआधी या मुलाच्या बॅगेत मोबाईल व रोख रक्कम सापडल्याने रूपा रेड्डी यांनी त्याला हॉस्टेलमधून काढून टाकले होते आणि पालकांना बोलावून त्याची तक्रार केली होती. याच रागातून त्याने मुख्याध्यापिकेच्या घरला लक्ष्य केले. ११ ऑगस्ट रोजी शाळेत विद्यार्थ्यांच्या फीचे लाखो रुपये जमा होणार असल्याने ती रक्कम रूपा रेड्डी यांच्या घरीच असेल, असा त्याचा समज होता. हत्येच्या ५ दिवसांआधी दोन्ही मुलांनी हातमोजे आणि चाकू खरेदी करून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेकी करून चोरीचा कट रचला.
११ ऑगस्ट रोजी एक मुलगा कंपाऊंडची भिंत ओलांडून आत शिरला, तर दुसरा बाहेर पाळत ठेवून उभा राहिला. आत शिरलेला मुलगा पैसे शोधत असताना फोनवर बोलणाऱ्या रूपा रेड्डी यांनी त्याला पाहिले. तो मुलगा ओळखीचा असल्याने आपण पकडले जाऊ आणि पोलीस तक्रार होईल या भीतीने त्याने रूपा रेड्डी यांच्यावर चाकूने सलग २७ वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो घरातून सुमारे अडीच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने रक्ताने माखलेले कपडे गटारात फेकून दिले. सध्या दोन्ही अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.