घरमालकाच्या घरात हात साफ करणारे ‘बंटी-बबली’  गजाआड; ''इतक्या'' लाखांचा मुद्देमाल जप्त
घरमालकाच्या घरात हात साफ करणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; ''इतक्या'' लाखांचा मुद्देमाल जप्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाव बदलून सिडकोतील माताजी चौक परिसरात राहणार्‍या भाडेकरू पती-पत्नीने मालक घरात नसताना मालकाच्या घरात चोरी केल्याची तक्रार प्राप्त होताच पुढील तपासात हे पती-पत्नी ऊर्फ बंटी-बबलीने संपूर्ण राज्यभरात व इतर राज्यांमध्येही असेच बहाणे करून घरफोड्या केल्या असल्याचे दिसून आले. अंबड पोलिसांनी या बंटी-बबलीकडून 16 तोळे वजनाचे 21 लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने, तसेच काही घरफोड्यांमधून चोरलेले दागिने विकून त्यातून खरेदी केलेले आठ मोबाईल, लॅपटॉप व अन्य वस्तू असा 24 लाख 42 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने जप्त केला आहे.

संपूर्ण राज्यातील तब्बल सुमारे 31 विविध शहरांमध्ये या बंटी-बबलीने चोर्‍या केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत माहिती अशी, की सिडकोतील माताजी चौक, विजयनगर येथे राहणारे फिर्यादी जयेश नानासाहेब वाक्चौरे यांनी दि. 23 जून रोजी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार त्यांचा भाडेकरू पंकज कदम याने घरमालक घरी नसताना घरफोडी करून सोन्याचांदीच्या दागिन्यांची चोरी केली. याबाबत अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने समांतर तपास केला. त्यात हेडकॉन्स्टेबल उल्हास गांगुर्डे, कॉन्स्टेबल सागर जाधव, राकेश पाटील व संभाजी शिंदे यांनी फिर्यादीच्या घराजवळ असलेले किराणा दुकान व इतर ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपी महिलेची ओळख पटविली.

तांत्रिक विश्‍लेषणातून आरोपींचा मोबाईल क्रमांक शोधला व त्यावरून हे घरफोडे अनुक्रमे नवनीत मधुकर नाईक (वय 46) व स्मिता ऊर्फ प्रिया नवनीत नाईक (वय 42, दोघेही रा. रिटा अपार्टमेंट, बोईसर, जि. पालघर) हे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, हेडकॉन्स्टेबल देसले, सुभाष ठुबे, दीपक निकम, संभाजी शिंदे, अंमलदार अनिल गाढवे, सचिन करंजे, योगेश शिरसाठ, फरीद इनामदार, तुषार मते, मयूर पवार, वैभव एखंडे, महिला पोलीस अंमलदार भारती बुट्टे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना बोईसर (ता. जि. पालघर) येथून ताब्यात घेतले. या बंटी-बबलीने राज्यात अनेक ठिकाणी अशाच चोर्‍या केल्या आहेत. त्यामुळे अंबड गुन्हे प्रकटीकरण पथक आणि घोटी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दोन्ही आरोपींकडून 21 लाख 11 हजार रुपये किमतीचे 16 तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत, तसेच काही दागिने विकून या भामट्या जोडप्याने आठ मोबाईल, लॅपटॉप व इतर वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यासह एकूण 24 लाख 42 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे
या बंटी-बबलीने राज्यात सुमारे 31 हून अधिक ठिकाणी चोर्‍या व घरफोड्या केल्या आहेत. त्यात नाशिकमधील अंबड, घोटी, ठाणे जिल्ह्यातील उरण व तळोजा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूंज, पुणे जिल्ह्यातील भोर शहर, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा, रायगड जिल्ह्यातील पोयनाड, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, मुंबईजवळील वाशी, जालना जिल्ह्यातील सदर बाजार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव छावणी येथील चोर्‍यांसंदर्भात काही केसेस कोर्टात चालू आहेत, तर काही ठिकाणच्या कोर्टाने आरोपींना पकडण्यासाठी वॉरंट काढले आहे, तर काही केसेस निकाली निघाल्या आहेत.

यासह या बंटी-बबलीविरुद्ध केआरपुरम पोलीस ठाणे (कर्नाटक), तसेच दापोली, सावंतवाडी, गुहागर, वाडा, रबाळे, मिरज, जालना, सफाळे, कोपरगाव, बारामती, लोणंद, भुईंज, खालापूर, शहापूर, इचलकरंजी व इगतपुरी येथील पोलीस ठाण्यांतही गुन्ह्यांची नोंद आहे.

राज्यातील अनेक घरफोड्या या जोडप्याच्या अटकेतून उघड झाल्या आहेत. या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण (गुन्हे), परिमंडळ-2 चे उपायुक्त किशोर काळे, अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी व पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे (प्रशासन) यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, तांत्रिक विश्‍लेषण शाखाप्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तरडे, हवालदार योगेश देसले, सुभाष ठुबे, कॉन्स्टेबल समाधान शिंदे, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, सागर जाधव, तुषार मते, अनिल गाढवे, फरीद इनामदार, वैभव एखंडे, मयूर पवार, योगेश शिरसाठ, करंजे, महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती बुट्टे, हेडकॉन्स्टेबल दीपक निकम, तांत्रिक विश्‍लेषण शाखेचे हवालदार विशाल साळुंके, विशाल वाजे व परिमंडळ-2 कार्यालयातील महिला हवालदार गायत्री गोसावी यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी व कॉन्स्टेबल राकेश पाटील हे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group