धक्कादायक !  अल्पवयीन मुलीवर शेजार्‍याचे वेळोवेळी अत्याचार; प्रसूतीनंतर बाळासह निर्जनस्थळी ठेवले डांबून
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर शेजार्‍याचे वेळोवेळी अत्याचार; प्रसूतीनंतर बाळासह निर्जनस्थळी ठेवले डांबून
img
Nandini khandare More

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दिंडोरी तालुक्यात एका विवाहित व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. यानंतर ही मुलगी गरोदर राहिली. एवढ्यावरच न थांबता, प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने तिला पळवून नेले आणि प्रसूतीनंतर नवजात बाळासह एका निर्जन झोपडीत डांबून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पीडित मुलगी आणि तिच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. रवींद्र मोरे असे या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र मोरे हा पीडित मुलीच्या शेजारी राहत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीच्या विश्‍वासाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारांमुळे मुलगी गरोदर राहिली. मात्र, हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि स्वतःवर कारवाई होऊ नये यासाठी आरोपीने पीडितेला पळवून नेल्याचे तपासात समोर आले आहे.आरोपीने मुलीला कानडी परिसरात नेले, जिथे तिने एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर पीडितेची आणि नवजात बाळाची काळजी घेण्याऐवजी आरोपीने त्यांना सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील एका निर्जन झोपडीत ठेवले. बाहेरील जगापासून दूर ठेवून त्यांना तिथेच डांबून ठेवल्याचा आरोप आहे.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि त्याला अटक केली. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या नवजात बाळाची सुरक्षित सुटका करण्यात आली.अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित कायद्यांनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group