सध्या राजभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून बीड मध्ये तर गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. आताच बीड मधून एक रक्तरंजित घटना उघडकीस आली आहे. सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाची निर्घृण हत्या करण्यात आली.
बीडमध्ये माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे ही घटना घडली. ३३ वर्षीय तरुणाची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मृताच्या गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे ही घटना घडली. सासुरवाडीत राहणाऱ्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. तरुणाच्या गळ्यावर, पोटावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वेळा वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. विकास दत्तात्रय वाघमोडे (रा. किट्टी आडगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. काही वर्षांपूर्वी त्याने तालखेड येथील अरुण नारायण राऊत गुरव यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता.
सासू-सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर विकास हा गेल्या ५ वर्षांपासून सासरी राहून त्यांच्या शेतीची देखभाल करत होता. रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शेतात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. त्यानंतर पत्नी आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. पण तो सापडला नाही. सोमवारी सकाळी तालखेडजवळील खंडोबा वडी परिसरात विकासचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहावरील जखमा पाहता तीक्ष्ण हत्याराने वार करून विकासची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. विकासची हत्या कुणी केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या घटनेमुळे तालखेड परिसरात खळबळ उडाली असून. जुन्या वादातून ही हत्याकांडाचीध झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणत्याही कारणाला दुजोरा दिलेला नाही. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.