धक्कादायक ! जुन्या वादातून देवळाली गावात तरूणाची  निर्घृण हत्या
धक्कादायक ! जुन्या वादातून देवळाली गावात तरूणाची निर्घृण हत्या
img
दैनिक भ्रमर


नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गावात जुन्या वादाची कुरापत काढून एका 36 वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे

विशाल सीताराम माळवे (वय 37, रा. सुवर्ण सोसायटी, देवळाली गाव) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित मित्राला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड (वय 39) हे दोन्ही मित्र काल (दि. 25) रात्री उशिरापर्यंत एकत्र पार्टी करीत बसले होते. पार्टी सुरू असतानाच त्यांच्यात जुन्या कारणावरून अचानक वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. नशेत असलेल्या संशयित अमोल गायकवाड याने रागाच्या भरात धारदार हत्यार काढून विशालवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विशाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि आज पहाटेच्या सुमारास त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, या घटनेची समजताच वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक डंबाळे, उपनिरीक्षक विशाल सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे, योगेश झाडे, अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी घरात लपून बसलेला अमोल गायकवाड यास घरझडती घेताना ताब्यात घेतले. तो घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत होता.

उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विवाहित विशालच्या मृत्यूने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.काही दिवसांपूर्वीच तपोवन परिसरात सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता, तर सातपूरमधील कामगारनगर येथील एका इमारतीच्या टेरेसवर युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटना ताज्या असतानाच आता देवळाली गावात नशेत असलेल्या मित्रानेच मित्राचा काटा काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group