नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका युवकाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले, तिला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे न्यूड फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन तिच्याकडून १२ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, हा छळ २०१९ पासून आतापर्यंत सतत सुरू होता. जेव्हा हा प्रकार सुरू झाला, तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. आरोपी महेंद्र संपत पोरजे याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवले. आरोपीने पीडितेला घाबरवण्यासाठी तिचे न्यूड फोटो काढले आणि ते तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊ लागला. याच भीतीचा फायदा घेऊन आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी पीडितेवर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही; त्याने पीडितेचे न्यूड फोटो तिच्या कुटुंबीयांना दाखवण्याची आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची धमकी दिली. या बदनामीच्या आणि भीतीपोटी जगत असलेल्या पीडितेकडून आरोपीने आतापर्यंत सुमारे १२ लाख रुपयेदेखील उकळले. अखेर धीर एकवटून पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. सहाय्यक निरीक्षक वायकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.