महिला पोलिस कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंधातून दुर्दैवी घटना; नकारानंतर टोकाचा निर्णय
महिला पोलिस कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंधातून दुर्दैवी घटना; नकारानंतर टोकाचा निर्णय
img
Nandini khandare More

प्रेमप्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. प्रेमप्रकरणातून हत्या, आत्महत्या असे गंभीर गुन्हे देखील घडत आहेत दरम्यान आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंधातून एका तरुणाने टोकाचा निर्णय घेत आपलॆ आयुष्यच संपावले आहे. 

मुंबईच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र लोकभवनात एक दुःखद घटना घडली आहे. येथे ड्यूटीवर तैनात असलेल्या स्टेट रिजर्व पोलीस फोर्स (SRPF) ग्रुप-१६, कोल्हापूरच्या कॉन्स्टेबल अमलदार कौस्तुभ सांगळे यांनी कथितरित्या आपल्या सर्व्हिस गनने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण लोकभवन परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस स्टेशनची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि चौकशी सुरू केली. घटना घडली तेव्हा लोकभवनाच्या आत मुंबई पोलीस अधिकारीही तैनात होते.

पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करत आहेत. घटनास्थळावरून मयत कौस्तुभने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट जप्त. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे कौस्तुभने आत्महत्या केल्याची पोलिसांची माहिती. मीरा-भाईंदरमधील महिला पोलिस कर्मचाऱ्याशी कौस्तुभचे प्रेमसंबंध होते. दोघेही २०२४ साली पोलीस दलात भरती झाले होते. कौस्तुभची प्रेयसी राहिलेल्या पोलीस महिलेने लग्नास नकार दिल्यानंतर कौस्तुभ तणावात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

कौस्तुभची कौटुंबिक परिस्थिती प्रचंड तणावाची होती. कौस्तुभच्या लहानपणीच त्याच्या आईचे निधन, वडिलांनी केलेलं दुसरे लग्न आणि बहिणीने वैयक्तिक कारणातून काही वर्षापुर्वी केलेली आत्महत्या अशी बरीच कारणे असल्याची माहिती समोर आली आहे. मानसिक आरोग्य मूल्यांकन वेळेत झाले होते का? याचीही चौकशी सुरु आहे. मलबार हिल पोलिसांनी एडीआर नोंदवत सर्व बाजूनी तपास सुरू केला आहे.

घटना कशी घडली?
कौस्तुभ सांगळे यांची संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत शिफ्ट होती. त्यांची लोकभवनातील टॉवर २ वर ड्यूटी होती. येथे प्रत्येक ३ तासांनी शिफ्ट बदलते. शिफ्ट संपण्यापूर्वी एका रूमसारख्या जागेत त्यांनी आपल्या सर्व्हिस गनने स्वतःला गोळी मारली.

आत्महत्येची माहिती कशी समजली?

कौस्तुभ यांच्याकडे एसएलआर (SLR) रायफल होती. त्याच रायफलमधील ७.६२ एमएमच्या गोळीने त्यांनी आत्महत्या केली. त्यांना रिलीव करण्यासाठी आलेल्या त्यांच्या सहकाऱ्याने रक्त पाहताच तातडीने इतरांना माहिती दिली. लगेच त्या ठिकाणाला सील करण्यात आले आणि चौकशी सुरू झाली. सूत्रांच्या मते, कौस्तुभ सांगळे यांना दारुचे व्यसन होते आणि ते डिप्रेशनमध्येसुद्धा होते. तरीही पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group