अनेकदा रात्रीच्या वेळी कुत्रे भुंकत असतात पण सहसा कोणी लक्ष ददेत नाही. एका ठिकाणी रात्रीच्या वेळी अचानक कुत्रे भुंकण्याचा आवाज येऊ लागला अन घरातील लोकांनी अंगणात जाऊन पाहिलं तर त्यांना एका थरारक दृश्याचं दर्शन झालं आहे.
गोव्याच्या खांडेपार येथे रात्रीच्या वेळी एका घरात अचानक मगर शिरल्याने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या मगरीला पाहून कुत्र्यांनी अचानक भुंकायला सुरुवात केल्याने घरातील लोक सावध झाले आणि त्यांनी प्राणी मित्राला बोलावले. त्यानंतर प्राणी मित्राने या मगरीला कोणतीही दुखापत न करता तिला सुखरुपणे रेस्क्यू केले आहे. या घटनेमुळे नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसात नद्यांची पाण्याची पातळी वाढल्यामुळे मगरी मानवी वस्तीमध्ये शिरण्याच्या घटनांमध्ये अलिकडे मोठी वाढ होत आहे. लोकांनी घाबरुन न जाता संबंधित यंत्रणांना या मगरींची माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की , मगरीला रात्री अचानक आल्याचे पाहून कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे घरातील लोक सावध झाले आणि त्यांनी या मगरीची सुटका करण्यासाठी प्राणी मित्र चरण देसाई यांना पाचारण केले. त्यानंतर चरण देसाई यांनी अत्यंत कौशल्य आणि सावधानतेने मगरीला कोणतीही दुखापत न करता तिची सुखरुप सुटका केली आहे. मुसळधार पावसाने नदीची पातळी वाढल्याने मगरींचे प्रस्थ वाढले आहे. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि मगर दिसल्यास तिच्याजवळ न जाता तातडीने वन विभाग तसेच प्राणी मित्रांना किंवा पोलिस – अग्निशमन यंत्रणेला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.