नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- जुन्या वैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून नाशिकरोड येथील टिळे हॉस्पिटलसमोरील गंगोत्री जनता स्टोअर्सजवळ रविवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेत सुमित अरुण पगारे याचा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. जुना वाद मिटवण्याचा आव आणून हातात हात मिळवण्याच्या बहाण्याने सुमितवर थेट दोन गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात १४ संशयितांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी 12 संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुमित श्याम भाटीया (वय २५, रा. सुभाषरोड, गुलजार वाडी, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन सुरेश पिवाल, शिवा सुरेश पिवाल, मन्ना भरत गांगुर्डे, राजिक शेख, राहुल सोनवणे, निशांत भारती, शाहीद शेख, आयुश भारती, अक्षद गोसावी, राजवीर गांगुर्डे, आशिष पिवाल, साद पठाण, अमोल उत्तम वाघ आणि पराग मिलिंद कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
भाटिया याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०२३ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल एनडीपीएस गुन्ह्यात मृत सुमित पगारे, त्याचा भाऊ सनी पगारे, अर्जुन पिवाल व मन्ना गांगुर्डे हे मध्यवर्ती कारागृहात होते. यादरम्यान सनी पगारेची पत्नी सना ही अर्जुन पिवालला भेटायला जात असल्याने जेलमध्येच त्यांच्यात मोठे भांडण झाले होते. त्या वेळी अर्जुनने बाहेर आल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली होती. मार्च २०२६ मध्ये अर्जुन आणि मन्ना जेलमधून बाहेर आले, तर सुमित पगारे हा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा (अंश एंटरप्रायजेस) व्यवसाय करत होता.