आंदोलक विद्यार्थिनीला पोलिसाकडून चुकीचा स्पर्श? व्हिडिओ व्हायरल
आंदोलक विद्यार्थिनीला पोलिसाकडून चुकीचा स्पर्श? व्हिडिओ व्हायरल
img
Nandini khandare More

नीट परीक्षा घोटाळा प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे.  दरम्यान आता कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईतल्या दादरमध्ये देखील हे आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. या आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेने मोठा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीने सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये आंदोलन सुरू असताना सिव्हिल ड्रेसमधील एक व्यक्ती विद्यार्थिनीला पकडून बाजूला नेत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थिनीचा आरोप आहे की, आंदोलन हटवण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तीने तिच्याशी आक्षेपार्ह पद्धतीने वर्तन केले तसेच धक्काबुक्कीही केली. या घटनेनंतर राजकीय स्तरावर संताप व्यक्त केला जात असून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर मनसेने देखील संताप व्यक्त केला. दरम्यान, संबंधित व्यक्ती शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या प्रकरणात त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांवर मुंबई पोलिसांनी भूमिका मांडली आहे.

मुंबई पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून ट्विट करत, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे म्हटले आहे. सध्या या घटनेबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, संबंधित व्हिडीओ आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस विभागाकडून पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group