सध्या राजकारणात निरनिराळ्या मुद्द्यांवरून अनेक घडामोडी सुरु असून असून आता सध्या अर्थखात्याच्या वाटपावरून मोठी खलबत सुरु आहे . या खातेवाटपा
वरून निरनिराळ्या चर्चाना उधाण आले असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचा दावा करत महायुतीतील चर्चांवर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ म्हणाले की, अर्थखाते निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून, अर्थखात्याबाबत लवकर निर्णय व्हावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास शिवसेनेचा विरोध असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीमध्ये अशा प्रकारे मतभेद करून चालणार नाहीत. युती स्थापन करताना जे ठरले होते, त्यानुसारच निर्णय व्हावा, अशी पक्षाची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबतही हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले. शरद पवार गटाची एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएमध्ये चौथा पक्ष घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जयंत पाटील यांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाला नकार दिल्यामुळे भविष्यात काय घडेल, हे सध्या सांगता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेल्या भेटीबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासंदर्भात ही भेट झाली होती. त्यापलीकडील घडामोडींबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ असून, मुख्यमंत्र्यांची भेट घेणे ही सामान्य प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, दुबार पेरणीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. २० तारखेपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट टळू शकते. मात्र, दुबार पेरणीची वेळ आल्यास जिल्हा नियोजन निधीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.