गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबाराचा थरार ! बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदारी
गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबाराचा थरार ! बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदारी
img
Nandini khandare More

काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सतत अभिनेता सलमान खानला लक्ष्य केलं जात आहे. याआधी बिष्णोई गँगकडून सलमानच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. सलमानशी जवळीक साधणाऱ्यावर हल्ला केला जाईल, अशी सातत्याने धमकी या गँगकडून देण्यात येते. दरम्यान आता गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली असून या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या मालकीच्या जिमबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील ही घटना असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर जिम परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर करत बिष्णोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बिष्णोई गँगमधील एक गुंड म्हणतोय, “अभिनेता सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे गुरू रंधावाला लक्ष्य करण्यात आलं आहे. हा फक्त ट्रेलर आहे.” या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी गुरू रंधावाच्या जिमच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. हे कृत्य खरोखरच एखाद्या टोळीचं आहे की कोणीतरी दहशत पसरवण्यासाठी बिष्णोईच्या नावाचा वापर करत आहे, हे निश्चित करण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची आणि सोशल मीडिया पोस्टच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे. त्यानंतरच परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group