गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक विद्यार्थिनीचे अपहरण करून छळ, मैत्रिणीचीही आरोपीला साथ
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक विद्यार्थिनीचे अपहरण करून छळ, मैत्रिणीचीही आरोपीला साथ
img
Chandrakant Barve
 नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):-शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरात महाविद्यालयीन युवकांच्या बिघडत्या वर्तणुकीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामनगाव येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या बाहेरून एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पॉक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळनेर (जि. धुळे) येथील १६ वर्षे १० महिने वयाच्या पीडित विद्यार्थिनीला २ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास शासकीय तंत्रनिकेतन (सामनगाव) महाविद्यालयाच्या बाहेरून आरोपी यतीश देविदास जाधव (रा. पिंपळनेर) याने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बळजबरीने बसवले. पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिला कसारा घाट परिसरात नेण्यात आले. तेथे तिने तीव्र विरोध केला असतानाही आरोपीने तिच्या गालाचा चावा घेत जबरदस्ती केली, तसेच फोटो काढून धमकावले. यानंतर तिला कॅनडा कॉर्नर येथील एका मित्राच्या खोलीवर नेण्यात आले. या संपूर्ण कृत्यात अनिकेत जाधव व चैताली दुकळे (दोन्ही रा. पिंपळनेर) यांनी यतीशला प्रत्यक्ष मदत केली.

या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून १८ ऑगस्ट रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरण, बेकायदेशीर डांबून ठेवण्यासाठी अपहरण, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी, अब्रूचा भंग करण्याचा प्रयत्न तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पॉक्सो) गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण कोरडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group