अलीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिशय गंभीर स्वरूपाच्या घटना घडताना दिसत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीकडून मोहरमदरम्यान 'पेन किलर'च्या नावाखाली उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटण्याच्या धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईतील भायखळा भागात काल ( शुक्रवारी ) एक व्यक्तीला मोहरमच्या मिरवणूकीत गोळ्या वाटताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या व्यक्तीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या आरोपीने पेन किलरच्या नावाखाली विषारी घटक असलेल्या गोळ्या वाटून घातपात करण्याचा कट आखल्याचे उघडकीस आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी सुरु असून या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास सुरु आहे. या संशयित व्यक्तीकडून १४,९०० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणावर डीसीपी जयंत मीणा यांनी सांगितले की, मोहरमच्या मिरवणुकीत एक संशयित तरूण दिसला होता. चौकशीअंती तो परवानगीशिवाय कॅप्सूल विकत असल्याचे निष्पन्न झाले. पहाटे 4 वाजता एका व्यक्तीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. मोहरमच्या मिरवणुकीला टार्गेट करण्यासाठी या तरुणाने हे कृत्य केल्याचे त्याने चौकशीत सांगितले. आरोपीचे नाव फय्याज निसार प्रेमजी असून अलीकडच्या काळात इराण आणि इराकला जाऊन आला आहे.
फयाजने 50 किलो झिंक फॉस्फाईडची ऑर्डर दिली होती. झिंक फॉस्फाईडचा वापर हा उंदीर मारण्याच्या गोळ्यांमध्ये केला जातो. काही दिवसांपासून तो राहत्या घरी एक एक ग्रॅम विष टाकून कॅप्सूल तयार करत होता. मोहरमला टार्गेट करण्याचा त्याचा हेतू होता. त्याने 2025 मध्ये इराण आणि इराकचा प्रवास केला होता. त्याच्याकडून 14900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. तर 30000 कॅप्सूल तयार करण्याचे त्याचे लक्ष्य होते. त्या कॅप्सूलचे वितरण झाले नाही. पोलिसांमुळे मोठा कट उधळला.
मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील मोठा कट
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील मोठा कट उधळण्यात यश मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा हेतू शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. त्याचे नाव फयाज प्रेमजी असून तो पुण्याचा असून लोकांना इजा पोहोचवण्याचा फयाजचा कट होता असं डीसीपी जयंत मीणा यांनी सांगितले.