भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला
भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (प्रतिनिधी) भावली डॅम-वॉटरफॉल ते मुंबई-आग्रा महामार्ग परिसरात एका कुटुंबियावर  ७ ते ८ अज्ञात तरूणांनी जीवघेणा हल्ला केला. महिलेचा विनयभंग, मोबाईल व सोन्याची चैन लुटली आहे.  सपोउनि रमेश टोपले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, दि. १२ जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजता पीडिता या पती व मुलांसह व इतर नातेवाईकांसोबत भावली डॅमजवळील धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सुमारे ६ वाजता परत निघत असताना धबधब्याजवळ दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिट्टी वाजवली. याचा जाब पीडितेच्या पतीने विचारल्यानंतर तेथे उपस्थित ७ ते ८ स्थानिकांनी त्यांच्याशी दमदाटी व धक्काबुक्की केली. त्यानंतर कुटुंबीय नाशिककडे निघाले असता पांढऱ्या रंगाची मारुती बलेनो (एमएच-४६ बीई-३७२१) व काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील आरोपींनी त्यांच्या टाटा सफारीचा पाठलाग करून वाहन अडवले.

आरोपींनी लाकडी बांबू, बेसबॉल स्टिक व लोखंडी रॉडच्या साहाय्याने कारची तोडफोड केली. कारची काच फोडून पीडितेचा विनयभंग करत त्यांच्या हातातील सॅमसंग एस-२४ अल्ट्रा मोबाईल हिसकावला. तसेच पतीच्या गळ्यातील सुमारे २ तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेत त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर घोटी टोलनाका परिसरात पुन्हा वाहन अडवून पतीला कारबाहेर ओढत बेसबॉल स्टिकने जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी वार चुकवला. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ फिर्यादीने मोबाईलमध्ये जतन करून पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर केले असून अंबड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group