आजकाल विवाहबाह्य संबंधातून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
प्रियकराच्या मदतीने एका महिलेने तिच्या पतीचा खून केला, पण तो अपघता दिसावा म्हणून मृतदेह दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला टाकून दिला होता. हत्या यशस्वी झाल्यावर या क्रूर आरोपींनी एकमेकांना फोन करून ‘कार्यक्रम ओके’ असा कोडवर्डदेखील म्हटल्याचे समोर आले. याप्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. नेकनूर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना बेडया ठोकत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पती-पत्नीचं नातं हे प्रेमाचं तर असतंच पण त्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो विश्वास, पण बीडमधल्या या घटनेतून विश्वासाचाच चक्काचूर झाल्याचे समोर आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे राहणाऱ्या प्रियंका सोनवणे हिचं किरण सोनवणेशी लग्न झालं. पण तिचं तिच्या पतीवर नव्हे तर दुसऱ्याच तरूणावर, दशरथ परदेशी याच्यावर प्रेम होतं. आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा, किरण याचा काटा काढण्याचं प्रियांकाने ठरवलं आणि प्रियकराच्या मदतीने प्लानही आखला.
तीने, तिचा पती किरण सोनावणे याची गळा आवळून हत्या केली. मात्र हत्येचा आळ आपल्यावर येऊ नये आणि सुखरूप सुटका व्हावी यासाठी त्या दोघांनी पुढंचही प्लानिंग करून ठेवलं होतं किरण सोनावणे याच्या हत्येनंतर हा प्रकार केवळ अपघात दिसावा म्हणून प्रियांका आणि तिचा प्रियकर दशरत या आरोपींनी किरणचा मृतदेह दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला टाकला होता. पोलिसांना हाँ मृतदेह रस्त्यावर सापडल्यावर त्यांनी तो ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि दुसरीकडे या घटनेचातपासही सुरू केला.
मात्र शवविच्छेदन अहवालात जे सत्य समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. गळा आवळल्याने किरण याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यावर पोलिसही अवाक झाले. त्यानंतर नेकनूर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि तांत्रिक तपास करून प्रियकर दशरथ परदेशी, त्याचा मित्र धीरज येडे आणि मृत व्यक्तीची पत्नी प्रियंका सोनवणे या तिघांना पनवेलमधून अटक केली. पतीच्या जाचाला कंटाळून आणि प्रेमसंबंधातून हा कट रचल्याचे तपासात उघड झाले. एवढंच नव्हे तरहत्या यशस्वी झाल्यावर आरोपींनी एकमेकांना ‘कार्यक्रम ओके’ असा फोन कॉल देखील केला होता, असंही तपासात समोर आलं, पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशी सुरू आहे. नेकनूर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा अवघ्या पाच दिवसांत लावला.