आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून थरारक अशा हत्याकटाच्या घटना सर्रासपणे घडत आहेत. दरम्यान अशीच एक अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात मृत तरुणीचा मावसभाऊच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र त्याने बहिणीची हत्या का केली, याचे अद्याप कारण समोर आलेले नाही. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात एका तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप असल्याने सुरुवातीला ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अमरावती शहर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर वेगाने चक्रे फिरवत घटनेचा छडा लावला.
तपासादरम्यान परिसरातील तसेच शहरातील विविध ठिकाणांवरील ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. या तपासातून मृत महिलेची ओळख काजल जितेंद्र इंगळे अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तिचा मावसभाऊ चेतन सुनिल थोरात याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने काजलचा खून केल्यानंतर तिची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला. मात्र गुन्हे शाखेच्या तपासामुळे आरोपीचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. या प्रकरणात आरोपीविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्यासंदर्भातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी फेकून दिलेल्या वस्तूंचा शोध पोलीस घेत आहेत.