आजकल फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. अनेक पद्धतीने भामटे हे आपली बोगसगिरी करत असून आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.तलाठी नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बोगस तलाठी भरती रॅकेट उघडकीस आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. मात्र, या रॅकेटचा प्रमुख बबनराव देवकते हा रांजणगाव शेणपुंजी येथे त्याच्या कथित पत्नी कोमल सावकेसोबत राहत असताना त्याच्याविरोधात तक्रार होऊनही कारवाई झाली नाही. परिणामी तो फरार झाला आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर संशय आणि संताप व्यक्त होत आहे.
उद्धव हरिभाऊ नरवडे यांनी 27 सप्टेंबर 2025 रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. नरवडे यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी 2023 मध्ये कोमल सावके त्यांच्या घरात भाड्याने राहण्यासाठी आली. काही दिवसांनी बबनराव देवकते तिच्यासोबत राहू लागला. स्वतःला मंत्रालयातील कर्मचारी सांगणाऱ्या देवकतेने तलाठी भरतीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.
नरवडे यांच्या मुलासाठी 15 लाख रुपये आणि त्यांच्या मित्राच्या मुलासाठी 10 लाख रुपये घेण्याचे ठरले. सुरुवातीला 5 लाख रुपये ऑनलाइन घेतल्यानंतर देवकतेने आणखी रक्कम उकळली. अखेरीस नरवडे आणि प्रदीप सवई यांच्याकडून एकूण 20 लाख रुपये घेतले. मात्र अंतिम निकालात दोघांचीही निवड झाली नाही. त्यानंतर देवकतेने "वेटिंगमधून काम करून देतो" असे सांगत वेळ मारून नेली आणि पैसेही परत केले नाहीत.
तक्रार करूनही पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये गुन्हा दाखल झाला, मात्र तपास पुढे सरकला नाही. दरम्यान, देवकते फरार झाला. त्याच्यासह कोमल सावकेविरुद्ध राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.
दरम्यान, एका बेरोजगार तरुणाने अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या कार्यालयात फोन करून पोस्टिंगची विचारणा केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी फसवणूक झालेल्या उमेदवारांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सप्टेंबर 2025 पासून गुन्हा दाखल असूनही कारवाई न झाल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
हातचा आरोपी पकडू न शकलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिसांमुळे आजघडीला जिल्हा प्रशासनाच्या डोक्याला ताप झाला आहे. एका बेरोजगार तरुणाने अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या कार्यालयात फोन करून पोस्टिंगची विचारणा केल्यानंतर हे प्रकरण थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेले. आता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आवाहन केले आहे, की फसवणूक झालेल्या बेरोजगारांनी समोर येऊन तक्रार करा. पण सप्टेंबर 2025 पासून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कारवाई केलेली नाही, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.
विशेष म्हणजे, नरवडे यांनी पोलिसांकडे सर्व पुरावेही दिले होते. त्या पुराव्यांचे काय झाले, हे पोलिसांनाच माहिती. जिल्हा प्रशासनाने आता थेट तक्रार अर्ज दिल्याने शहर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपास तडीस न्यावा. वाळूज एमआयडीसी पोलिसांवर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा फसवले गेलेल्या बेरोजगारांकडून होत आहे.