नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-मध्यरात्रीच्या सुमारास बंद दुकानाचा पत्रा तोडून 'अमोल आईस्क्रीम पार्लर'मधून रोख रक्कम लांबवणाऱ्या सराईत चोराला उपनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. चेहरा पूर्णपणे झाकलेला असतानाही केवळ अंगावरील मळलेल्या कपड्यांच्या धाग्यावरून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. या कारवाईत पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले असून, दोन गुन्हे उघडकीस आणत ४७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील गोसावी वाडी, शाहू महाराज पथ येथील सत्यम हॉलसमोरील पिंपळे अपार्टमेंटमध्ये हार्दिक प्रकाश दंडगव्हाळ (वय २९) यांचे 'अमोल आईस्क्रीम पार्लर' आहे. २७ जून रोजी रात्री ११:३० नंतर अज्ञात चोरट्याने दुकानाचा पत्रा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने काउंटरचा ड्रॉवर खोलून आतील रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ व पोलीस निरीक्षक डंबाळे यांनी गुन्हेशोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. चोरट्याने गुन्हा करताना चेहरा पूर्णपणे कपड्याने झाकलेला असल्याने त्याची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते. मात्र, गुन्हेशोध पथकाने फुटेजची अतिशय बारकाईने पाहणी केली. त्यात आरोपीच्या अंगावर मळलेले कपडे असल्याचे निष्पन्न झाले.
याच धाग्यावरून पोलिसांनी परिसरातील सर्व गॅरेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा शेजारीच असलेल्या एका गॅरेजवर सीसीटीव्हीमधील शरीरयष्टीशी मिळताजुळता आणि तशाच कपड्यांमधील एक इसम काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या एका विधी संघर्षित मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी डिसेंबर महिन्यात केलेल्या एका चोरीच्या पैशातून त्याने एक मोटारसायकलही (क्रमांक एमएच १५ ए डब्ल्यु ९९८३) खरेदी केली होती. हे वाहन पोलिसांनी जप्त केले. तसेच २७,५५० रुपयेही हस्तगत करण्यात आले. उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलीस अंमलदार योगेश जाधव, पंकज कर्पे, संदेश रगतवान, सूरज गवळी, सुनील गायकवाड, जयंत शिंदे, गौरव गवळी, प्रशांत देवरे, अनिल शिंदे यांच्या पथकाने केली.