निवृत्तीनाथ महाराज पालखी बंदोबस्तात नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई; श्रीरामपुरात गोळीबार करून पळणारे २ सराईत गुन्हेगार जेरबंद
निवृत्तीनाथ महाराज पालखी बंदोबस्तात नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई; श्रीरामपुरात गोळीबार करून पळणारे २ सराईत गुन्हेगार जेरबंद
img
Chandrakant Barve


नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या कडक बंदोबस्तात तैनात असलेल्या नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अहिल्यानगर (अहमदनगर) पोलिसांच्या मदतीने एक मोठी कामगिरी केली आहे. श्रीरामपूर येथे एका तरुणावर भरदिवसा गोळीबार करून दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. चहेडी जकात नाक्यावर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ही कारवाई केली. अक्षय किरण कपोते आणि अभय सुरेश ससाने (दोघे रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २ जुलै) दुपारी ११ ते १२ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर येथे शुभम यादव या तरुणावर जुन्या वादातून संशयित आरोपी अक्षय कपोते आणि अभय ससाने यांनी गोळीबार केला होता. या घटनेत शुभम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. गोळीबार केल्यानंतर दोघेही आरोपी पल्सर मोटारसायकलने नाशिकच्या दिशेने पळून गेल्याची माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि फौजदार महादेव गुठ्ठे यांनी नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना फोनवरून दिली. तसेच आरोपींचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी व गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे हे नाशिक-पुणे हायवेवरील चहेडी जकात नाक्यावर पालखी बंदोबस्तात असतानाच सतर्क झाले.

मिळालेल्या फोटोंच्या वर्णनावरून पोलीस पथक येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवून होते. त्याच वेळी एक पल्सर मोटारसायकल संशयास्पदरीत्या येताना दिसली. त्यावर बसलेल्या दोघांनी आपले चेहरे लपवण्याचा प्रयत्न केला. 

संशय आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून दोघांना जाळ्यात ओढले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अक्षय कपोते व अभय ससाने अशी सांगितली. अहिल्यानगर पोलिसांच्या फोटोंशी चेहरा तंतोतंत जुळल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना अहिल्यानगर एलसीबीच्या स्वाधीन केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group