सुरगाणा, दिंडोरी, पेठला सलग दुसऱ्या दिवशी तर कळवणला पहिल्यांदाच भूकंपाचे धक्के
सुरगाणा, दिंडोरी, पेठला सलग दुसऱ्या दिवशी तर कळवणला पहिल्यांदाच भूकंपाचे धक्के
img
चंद्रशेखर गोसावी
सुरगाणा -  नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यांमध्ये दुसऱ्या दिवशीही भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाचा केंद्रबिंदू हा नाशिक पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. या धक्क्यामध्ये पेठ तालुक्यातील आश्रमशाळेला तडे गेल्याचे समजते. 

शनिवारी सकाळी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि दिंडोरी तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणविले होते. त्यानंतर प्रशासन सतर्क झालेलं होतं. त्यामुळे या परिसराशी सातत्याने संपर्क ठेवला जात होता. नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव व इतर भागांचा दौरा केला. या ठिकाणी नागरिकांशी त्यांनी चर्चाही केली होती. 

आज पहाटेच्या सुमारास पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि कळवण या चार तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यात दळवट या परिसरामध्ये शनिवारी रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी भूकंपाचे धक्के 20 ते 30 सेकंद जाणविले. या काळात जोपर्यंत भूगर्भातील हालचालींच्या धक्क्यांची जाणीव होत होती तोपर्यंत घराच्या भिंती आणि खिडकीच्या काचा आणि काही परिसरामध्ये खिडक्या देखील हलत असल्याचे नागरिकांकडून प्रशासनाला सांगण्यात आले आहे. 

सुरगाणा तालुक्यातील सराड,  चिखली व अन्य परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यावेळी सराड येथील शासकीय आश्रम शाळेच्या भिंतीला मोठे तडे देखील गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर पेठ तालुक्यातील शिवशेत गावाला मध्यरात्री 2 वाजून 44 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. दिंडोरी तालुक्यातील ननाशी गाडगीचा वाडा या परिसरामध्ये रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणविल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

नागरिकांकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने सीडीओ मेरी येथील भूकंपमापन विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी नाशिक पासून 45 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगितले असून रिक्टर्स स्केल वर 3.6 इतकी नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच यात कोणतीही जीवितहानी आणि वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सातत्याने  जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने सर्व ती तयारी केली आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर वरती विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत यांनी केले आहे.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group