नाशिक जिल्ह्यातील
नाशिक जिल्ह्यातील "या" तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर, वांझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे आणि मोहपाडा (चि.) या गावांमध्ये आज (दि. २५ जुलै) सकाळी ९.५५ ते दुपारी १२.१० या कालावधीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून, जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणांकडून घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI) कडून प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी ९.५५ वाजता ३.० रिश्टर तीव्रतेचा, सकाळी १०.०१ वाजता २.२ रिश्टर तीव्रतेचा, सकाळी १०.०२ वाजता २.० रिश्टर तीव्रतेचा आणि दुपारी १२.१० वाजता २.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. हे सर्व धक्के नाशिक वेधशाळेपासून सुमारे ४५ ते ४७ किलोमीटर अंतरावरील परिसरात नोंदविण्यात आले.
याशिवाय, दिंडोरी तालुक्यातील भनवड येथेही दोन सौम्य धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावर असत्यापित माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) पूर्ण क्षमतेने कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्कालीन मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२५३-२३१४१८१ उपलब्ध आहेत.

भूकंपमापन यंत्रणा (MERI, नाशिक) व संबंधित तज्ज्ञांकडून सद्यस्थितीचे सातत्याने विश्लेषण करण्यात येत असून, पुढील अद्ययावत माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांनी नजीकच्या तहसील कार्यालय अथवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group