नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील जय भवानी रोड परिसरातील साम्राज्य बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (दि. १०) एक धक्कादायक घटना घडली.
चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या २८ वर्षीय पत्नीवर तिचे आई समोर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वैशाली हनुमान हिंगे असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या आईने उपनगर पोलीस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिना काशिराम बलखंडे (वय ५३, रा. फ्लॅट नं. १७, साम्राज्य बिल्डिंग, जय भवानी रोड) या आपली मुलगी वैशाली, नात स्वरा आणि जावई हनुमान त्र्यंबक हिंगे (मूळ रा. परभणी) यांच्यासह एकत्रित राहतात. वैशाली ही स्पा मध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. दोन महिन्यांपूर्वीच वैशाली आणि हनुमान यांचे दुसरे लग्न झाले होते. मात्र, लग्न झाल्यापासूनच संशयित पती हनुमान हा वैशालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. यावरून दोघांमध्ये घरात नेहमीच वाद होत होते.
शुक्रवारी वैशाली हिची आई मिना बलखंडे या फिजिओथेरपीसाठी बाहेर गेल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वैशालीने आईला फोन करून, "पती हनुमान याने माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे, तू तातडीने घरी ये," अशी माहिती दिली. मिना यांनी तात्काळ घरात धाव घेतली असता, वैशाली ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
तिच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या होत्या. "तू माझ्यासोबत कामासाठी परभणीला चल," असा तगादा हनुमानने लावला होता. वैशालीने नकार दिला असता, "तू परभणीला न येण्याचे कारण मला चांगलेच माहिती आहे. तू येत नाहीस तर मी तुला आज संपवूनच टाकतो," असे म्हणत हनुमानने तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला, असे जखमी वैशालीने उपचारादरम्यान सांगितले.
प्रकृती चिंताजनक, जिल्हा रुग्णालयात हलवले
रक्तबंबाळ झालेल्या वैशालीला आईने परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने प्राथमिक उपचार करून तिला तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्यातरी तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ तसेच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. पीडितेच्या आईच्या जबाबावरून संशयित आरोपी पती हनुमान त्र्यंबक हिंगे (रा. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे.