नाशिक : राज्यभर गाजलेल्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणातील प्रशांत तुळशीराम वाडीले (रा. धुळे) याला पोलिसांनी धुळे शहरातून ताब्यात घेतले. यापूर्वी या घोटाळ्याप्रकरणी १,१९९ संशयितांविरुद्ध तब्बल १,१०० पानी दोषारोपपत्र नाशिकरोड न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वाडीले हा धुळे येथे वास्तव्यास असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई केली. एटीएसचे प्रमुख तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाने धुळे येथे सापळा रचून वाडीले याला ताब्यात घेतले.
या मोहिमेत हवालदार कराड, गिते, येवले तसेच अंबड गुन्हे शाखा युनिट-३चे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार बोडके, पचलोरे आणि महाले यांनी सहभाग घेतला. ताब्यात घेतलेल्या संशयिताला नाशिक येथे आणण्यात आले. आज वाडिलेला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने १७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.