सिन्नर फाट्यावर दरोड्याचा मोठा डाव उधळला; नाशिकरोड पोलिसांची मध्यरात्री धाडसी कारवाई
सिन्नर फाट्यावर दरोड्याचा मोठा डाव उधळला; नाशिकरोड पोलिसांची मध्यरात्री धाडसी कारवाई
img
Nandini khandare More

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत घटनास्थळावरून तीन दरोडेखोरांना रंगेहात अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

बुधवारी (८ जुलै) मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास नाशिकरोड पोलिसांचे गस्ती पथक सिन्नर फाटा परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी सिटी लिंक बस डेपोच्या आवारात काही संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी तातडीने वेढा घालत छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून साहेबराव गोविंद डोंगरे (वय २५, रा. कॅनल रोड, श्रमिक नगर झोपडपट्टी, जेलरोड), रामदास देविदास सूर्यवंशी (वय २१, रा. कॅनल रोड, श्रमिक नगर झोपडपट्टी, जेलरोड) आणि गणेश भिकाजी खेडेकर (वय २८, रा. रेणुका माता मंदिराजवळ, शिंदेंगाव, नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दरोडा घालण्याच्या उद्देशाने आणलेले साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मिरची पूड आणि सुती दोरी, एक स्क्रू-ड्रायव्हर आणि निळ्या रंगाचे कव्हर असलेली लोखंडी पकड, लोखंडी करवत आणि चाकू सारखी दिसणारी लोखंडी कटावणी मिळून आले.,

पोलिसांनी कारवाई करत असतानाच, संशयित सागर सूर्यवंशी आणि निखिल धकाते (दोघे रा. नाशिक) हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या नजरेआड होत पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस आता या पसार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी पोलीस अंमलदार योगेश खंडेराव रानडे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे करत आहेत. दरम्यान, रामदास सूर्यवंशी याची सखोल चौकशी केली असता साथीदार करण घुगे (सिन्नर) याच्या सोबतीने जेलरोड परिसरात वृद्ध महिलेच्या घरात घुसून सोन्याचे कानातील टॉप्स व मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. हे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. 

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी (गुन्हे), घनदाट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी व गुन्हे शोध पथकातील हवालदार विशाल पाटील, नितीन भामरे, सागर आहणे, महेंद्र जाधव, नाना पानसरे, अरूण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुंवर, समाधान वाजे, रोहीत शिंदे, अजय देशमुख, दिपका दिवटे, तसेच सी. आर. मोबाईल वरील अंमलदार अर्जुन गिते, मंगेश बोडके यांनी ही कामगिरी बजावली.
इतर बातम्या
गंगापूर धरण

Join Whatsapp Group