नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत घटनास्थळावरून तीन दरोडेखोरांना रंगेहात अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (८ जुलै) मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास नाशिकरोड पोलिसांचे गस्ती पथक सिन्नर फाटा परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी सिटी लिंक बस डेपोच्या आवारात काही संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी तातडीने वेढा घालत छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून साहेबराव गोविंद डोंगरे (वय २५, रा. कॅनल रोड, श्रमिक नगर झोपडपट्टी, जेलरोड), रामदास देविदास सूर्यवंशी (वय २१, रा. कॅनल रोड, श्रमिक नगर झोपडपट्टी, जेलरोड) आणि गणेश भिकाजी खेडेकर (वय २८, रा. रेणुका माता मंदिराजवळ, शिंदेंगाव, नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दरोडा घालण्याच्या उद्देशाने आणलेले साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मिरची पूड आणि सुती दोरी, एक स्क्रू-ड्रायव्हर आणि निळ्या रंगाचे कव्हर असलेली लोखंडी पकड, लोखंडी करवत आणि चाकू सारखी दिसणारी लोखंडी कटावणी मिळून आले.,
पोलिसांनी कारवाई करत असतानाच, संशयित सागर सूर्यवंशी आणि निखिल धकाते (दोघे रा. नाशिक) हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या नजरेआड होत पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस आता या पसार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.या प्रकरणी पोलीस अंमलदार योगेश खंडेराव रानडे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे करत आहेत.