पुण्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पुण्याच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी जलदगतीने सुनावणी होत आहे.
दरम्यान , या प्रकरणाच्या खटल्याने आता अत्यंत संवेदनशील वळण घेतले आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयात सुरू असलेल्या या जलदगती सुनावणीदरम्यान, त्या चिमुरडीच्या मृत्यूचे भयंकर पुरावे समोर मांडण्यात आले. यावेळी साक्षीदारांचेही डोळे पाणावले. अवघा न्यायालयीन कक्ष या दुःखाने हेलावून गेला होता.
१ मे रोजी नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यात भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची जलदगती सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी पहिल्या सहा महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नोंदवली. या साक्षीदारांमध्ये पीडितेची आई, वडील, मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडितेसोबत पाहिलेले दोन प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ यांचा समावेश होता.
सुनावणीदरम्यान जेव्हा सरकारी पक्षाने न्यायालयासमोर अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक पुरावे सादर केले, तेव्हा कोर्टातील वातावरणच बदललं. आरोपीने पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग्रामस्थांनी कोर्टात सांगितले की त्यांनी आरोपीला मुलीसोबत पाहिले होते. कोर्टात घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि पीडितेचे छायाचित्रे दाखवण्यात आली. तेव्हा आरोपीची ती क्रूरता पाहून आणि मृत चिमुरडीचा चेहरा पाहून साक्षीदारांना आणि आई-वडिलांना अक्षरशः रडू कोसळले.
धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर नराधम आरोपीने चिमुरडीचा मृतदेह लपवून पुरावा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा चालवण्यासाठी अधिकृत कलमवाढीचा अर्ज कोर्टात सादर केला आहे. यावर सरकार आणि बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद रंगला.
"नसरापूर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने दररोज सुनावणी घेऊन खटला जलदगतीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरोधात आरोप निश्चित झाले असून आम्ही लवकरात लवकर हा खटला निकाली काढून पीडितेला न्याय मिळवून देऊ आणि समाजात एक कडक संदेश देऊ." ॲड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील