शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
img
Nandini khandare More

राजकारणातील घडामोडींना वेग आला असून सध्या शरद पवार गटातून एक मोठी अपडेट समोर येत आहेत. शरद पवार गटाच्या हालचालींवरून सध्या राजकारणात मोठा भूकंप येणार की काय अशा चर्चा सुरु आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार , राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट ) पक्ष हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेने सध्या जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यादृष्टीने विचारमंथन सुरु असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनाही हायकमांडने दिल्लीला बोलावल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

नाना पटोले यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांना दिला होता. मात्र, काही कारणास्तव त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशावेळी सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवायला, जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहे, त्यांनी एकत्रित यावे, अशी प्रक्रिया सुरु झाली आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. 

भाजपला रोखण्यासाठी देशपातळीवर सेक्युलर आघाडी उभी करण्यासाठी पवार साहेब, तृणमूल काँग्रेस हे सगळे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करायचं, या मानसिकतेत आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी या सगळ्यांकडून यासंदर्भात विचारमंथन सुरु आहे. सेक्युरल मतांना एकत्रित करणे, सेक्युलर विचार संपवणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे ह एकमेव अजेंडा आहे. मोदी सरकारकडून देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचं आणि पाळंमुळं खोदण्याचं काम सुरु आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

मागील दोन-तीन दिवसांपासून काँग्रेस सोबत इतर समविचारी पक्ष ज्यांनी काँग्रेसला सोडून वेगळा पक्ष स्थापन केला त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सोबत एकत्र यावे, असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडल्यानंतर काँग्रेस सोबत तृणमूल काँग्रेस त्यासोबतच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे मूळ काँग्रेस पक्षात विलीन होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप विरोधात काँग्रेस आणखी मजबूत करायचा असेल तर या काँग्रेसपासून दूर गेलेल्या आणि मूळ काँग्रेस विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र यायला हवं आणि त्यासाठी पुढाकार शरद पवारांनी घ्यायला हवा, असे मत संजय राऊत यांनी मांडले होते. 

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणा संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार यावर निर्णय घेतील असे म्हटले. तर अशा प्रकारचा काँग्रेसकडून कुठला प्रस्ताव नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले. 

काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भातला निर्णय हा शरद पवार घेतील. त्यामुळे आपण यावर कुठलंही भाष्य करणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. तर आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत, या सगळ्या विलिनीकरणासंदर्भातला निर्णय शरद पवार घेतील, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली. तर सुप्रिया सुळे यांनीही संजय राऊतांच्या वक्तव्यावर सावध पवित्रा घेत स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे म्हटले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group