दिल्लीतील CJP आंदोलनासह विविध विद्यार्थी संघटनांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे विविध चर्चाना उधाण आले आहे.
या भेटीला सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि संसदेतील चर्चेच्या मागणीदरम्यान ही भेट होत असल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
याआधी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, चर्चा कोणत्या नियमांतर्गत आणि कोणत्या स्वरूपात घ्यायची, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या भेटीनंतर सरकारकडून कोणती भूमिका स्पष्ट केली जाते, याकडे राजकीय वर्तुळासह आंदोलनकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.