ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली.या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. गोळ्या झाडणाऱ्यांमागे खरे सूत्रधार शिंदे गटातच असून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
राऊत यांनी राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत, गृहमंत्री ठाण्यातील स्थिती हाताळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली. ठाणे हे एकेकाळी शांत शहर म्हणून ओळखले जात होते, मात्र आता ते गुंड, अमली पदार्थ विक्रेते आणि बिल्डर लॉबीचे केंद्र बनले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राऊत यांच्या माहितीनुसार, पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राजन विचारे या प्रकरणात लक्ष घालून आहेत. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांसोबत पक्ष खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.