सध्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत असून आता महायुती मधून एक मोठी खळबळजनक अपडेट समोर आली आहे. भाजपने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला. भाजपने शिंदेंसेनेच्या बड्या नेत्याला फोडलं. शिंदेसेनेच्या बड्या नेत्यासह ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या सर्वांनी कमळ हाती घेतलं या पक्षप्रवेशामुळे सोलापूरमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, डीसीसीचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्यासह २०० पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतलं.
मंगळवेढा शहरासह ग्रामिणचे १० सरपंच, ४० ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती सभापतीसह १७ संचालक, खरेदी विक्री संघाचे १५ सदस्य, ७० सोसायटी सदस्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. नगरपरिषदेला बबनराव आवताडे गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. मात्र आता ऐन डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी सांगितले की, 'मंगळवेढ्याच्या विकासाची कामं हे आमचे मुख्य ध्येय आहे. मंगळवेढ्याचा विकास होणं गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आम्हाला असेल. आमच्या मंगळवेढ्याचा विकास होईल अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही मंगळवेढा हद्दवाढीचा प्रस्ताव करणार आहे.'