राजकारणातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हरियाणा तसेच मध्य प्रदेशचे माजी प्रभारी दीपक बाबरिया यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. तयांच्या निधनाच्या वृत्ताने काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दीपक बाबरिया काँग्रेसचे माजी सरचिटणीस होते. त्यांनी हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून महत्वाची जबाबदारी सांभाळाली होती. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले होते.
ऑक्टोबर 2024 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बाबरिया यांनी हरियाणाच्या प्रभारी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. याबाबत बोलताना त्यांनी मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीला जबाबदारी देण्याची विनंती केली होती. माझी प्रकृती ठीक नाही आणि निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही माझी नैतिक जबाबदारी देखील आहे, असे त्यांनी म्हटले होते. याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर सोपवला होता.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बाबरिया यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.