राज्यात भोंदू बाबा अशोक खरातची विविध प्रकरणं समोर येत असून राज्यभर चर्चेत असलेल्या स्वयंघोषिक आध्यात्मिक गुरू आणि भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेट नुसार आता राजकारणात खळबळ निर्माण करणारी बातमी समोर आली आहे.
या प्रकरणात भोंदू मनोहर मामा आणि भाजप नेता रामदास झोळ या दोघांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामिण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही कारवाई केली. स्वत:ला बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत भविष्य बदलण्याचे आमिष दाखवत मनोहर मामा भक्तांची फसवणूक करायचा. त्याच्याविरोधात आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कारासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत आहे.
भोंदू मनोहर मामा, त्याचा साथीदार, भाजप नेता रामदास झोळ, त्याची पत्नी माया झोळ यांच्यासह एकूण ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. भोंदू मनोहर मामा आणि रामदास झोळ यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. रामदास झोळ हा अनेक दिवसांपासून फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. रामदास झोळ यांच्यासह ८ जणांवर कारवाई करण्यात आल्यामुळे सोलापूरमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.
भाजप नेता रामदास झोळ हा दत्तकला शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. भोंदूबाबा मनोहर मामा प्रकरणाच्या तपासादरम्यान भाजप नेत्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर रामदास झोळ याच्यासह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती पण रामदास झोळ फरार झाला. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली होती की, भोंदूबाबा मनोहर भोसले याच्या अघोरी कृत्यातून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट दत्तकला शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणजेच भाजप नेता रामदास झोळ लावायचा.
भोंदूबाब मनोहर मामा प्रकरणात रामदास झोळचे नाव समोर आल्यानंतर कुडुवाडी पोलिस ठाण्यात एप्रिल २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रामदास झोळ फरार झाला. रामदास झोळशी संबंधित दत्तकला शिक्षण संस्थेतील कागदपत्रे, रजिस्टर, संगणक आणि इतर साहित्य पोलिसांनी तपासासाठी जप्त केले हेते याद्वारे पैशांच्या व्यवहारांची चौकशी सध्या सुरू आहे.