आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून अनेक फसवणुकीचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या प्रकारांना कितीही आळा घालण्याचा प्रयत्न केला तरी भामटे कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा अवलम्ब करत असे कृत्य करतच असतात. दरम्यान आता अशीच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास रोड परिसरात शेती विकून मिळालेली रक्कम घरात ठेवलेली होती. मात्र, 27 मे रोजी दुपारी कपाट उघडून पाहिले असता यातील 1 लाख 60 हजार रुपये कमी असल्याचे आढळले. त्यानंतर पालकांनी मुलांकडे विचारपूस सुरू केली. तेव्हा 10 वर्षांच्या मुलाने शेजारी उद्धव बिलवने याला पैसे दिल्याची कबुली दिली.
बिलवने याने 10 वर्षांच्या मुलाला त्याच्याच वडिलांची भीती घातली. ‘तू वाईट वागतोस ते तुझ्या पप्पांना सांगून तुला मारहाण करायला लावेल’, अशी धमकीच तो सतत देत होता. वडिलांच्या भीतीने घाबरलेल्या मुलाने घरात कुणी नसताना कपाटातून वेळोवेळी 10 हजार रुपये काढून खिडकीतूनच बिलवनेच्या हवाली केले. 6 मे ते 25 मे दरम्यान तब्बल 1 लाख 60 हजार रुपये त्याला दिल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान, पालकांच्या तक्रारीवरून बिलवने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. आरोपीचा भेळचा गाडा असून तो केटरिंगचे काम करतो. त्याने मुलाकडून पैसे उकळल्यानंतर स्वत:चा गाडा दुरुस्त करून घेतला. त्यानंतर तो वॉटर डॅमला फिरायला गेला. अवघ्या 15 दिवसांत त्याने सर्व पैसे मौजमजेतच उडवले. त्याला अटक केली तेव्हा त्याच्या खिशात अवघे 500 रुपये आढळले. तेच पोलिसांनी जप्त केले.