महावितरणच्या दोन कार्यकारी अभियंत्यांना
महावितरणच्या दोन कार्यकारी अभियंत्यांना "या" प्रकरणी कारणे दाखवा नोटीस
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- जेलरोड परिसरात १ जुलै रोजी झालेल्या दुर्दैवी विद्युत अपघाताची महावितरण कंपनीने गंभीर दखल घेतली असून, कनिष्ठ तंत्रज्ञाच्या निलंबनानंतर आता नाशिक परिमंडळ आणि मंडळ कार्यालयातील दोन कार्यकारी अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी कार्यकारी अभियंता योगेश निकम आणि कार्यकारी अभियंता नंदकिशोर काळे यांना ही नोटीस बजावली आहे.

जेलरोड परिसरातील नारायण बापूनगर येथे विद्युत रोहित्रावर देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना महावितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ जय सकट यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली होती.
या अपघातावेळी जय सकट यांच्यासोबत कनिष्ठ तंत्रज्ञ राजेश चौरे कार्यरत होते. कामादरम्यान आवश्यक वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) वापर न करणे तसेच सहकाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक दक्षता न घेणे, या कारणांमुळे राजेश चौरे यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने महावितरणने पाऊल उचलले आहे. कार्यकारी अभियंता योगेश निकम आणि नंदकिशोर काळे यांनी कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षा नियमांचे पालन, जनमित्रांसह संबंधित कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा साधनांचा अनिवार्य वापर तसेच सुरक्षित कार्यपद्धतीबाबत प्रभावी प्रबोधन आणि देखरेख केली नसल्याचा ठपका ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीशीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीबाबत खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर महावितरणमध्ये विद्युत सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत अधिक काटेकोर भूमिका घेतली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group