नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील ६ लाखांची बॅग पळवणारे रिक्षाचालक गजाआड
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील ६ लाखांची बॅग पळवणारे रिक्षाचालक गजाआड
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून प्रवाशाची ६ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेणाऱ्या रिक्षाचालकाचा नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अखेर पर्दाफाश केला आहे. अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी सलग दोन ते तीन दिवस ‘डमी प्रवासी’ बनून विविध रिक्षांमधून प्रवास केला आणि आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

या कारवाईत मुख्य संशयित रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काठेगल्ली येथील रहिवासी सौरभ गिरीश आहेर (वय ३०) हे २० जून रोजी पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी ६ लाख रुपयांची रोकड चॉकलेटी रंगाच्या बॅगेत घेऊन मुंबई-ठाणे येथून रेल्वेने नाशिकरोड येथे आले होते. रेल्वे स्थानकाबाहेर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना एका रिक्षाचालकाने त्यांना काठेगल्ली येथे सोडण्याचे कबूल केले.

आहेर यांनी पैशांची बॅग रिक्षामध्ये ठेवून भाड्यासाठी सुट्टे पैसे घेण्यास बाजूला जाताच, संधी साधून रिक्षाचालक बॅगेसह क्षणार्धात फरार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासूनही कोणताही ठोस धागादोरा हाती लागला नाही. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी वेगळी रणनीती आखत स्वतः प्रवासी बनून नाशिकरोड ते नाशिकदरम्यान विविध रिक्षांमधून दोन ते तीन दिवस प्रवास केला.

या दरम्यान एका रिक्षाचालकाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मोईन कुरेशी (रा. वडाळा नाका, जुने नाशिक) यानेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने २३ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. सायंकाळी संशयित त्याच्या एमएच १५ जेए ५०९४ क्रमांकाच्या रिक्षासह येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

कसून चौकशीदरम्यान मोईन कुरेशी याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पंचांसमक्ष २ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुढील तपासात त्याने त्याचा साथीदार शहबाज सय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) याचे नाव उघड केले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून आणखी २ लाख रुपये जप्त केले.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी चोरीची ६ लाख रुपयांची रक्कम आपापसात वाटून घेतल्याची कबुली दिली आहे. उर्वरित २ लाख रुपये हे त्यांच्यासोबत असलेल्या पुणे येथील २० ते २५ वर्षीय एका अनोळखी तरुणाकडे असल्याचे त्यांनी सांगितले असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या कारवाईमुळे नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, गुन्हे शोध पथकाच्या ‘डमी प्रवासी’ मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group